परांजपे नाव कसे पडले ?
परांजपे नावाची व्युत्पत्ती

महाराष्ट्रात ब्राह्मण समाज लोकसंख्येच्या दृष्टीने जरी लहान असला तरी तो आर्थिक, सामाजिक बुद्धिमत्ता, उद्योगीपणा, सैनिकी बाणा, समाजसुधारणा, स्वातंत्रचळवळीतही प्रमुख सहभाग या दृष्टीने महत्वाचा आहे. ब्रह्मन् समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणजे चित्पावन समाज होय. चित्पावनांबद्दल इतर सर्व समाजामध्ये एक प्रकारचे कुतूहल, औत्सुक्य आढळते. हा चित्पावन समाज अनेक घराणे, कुळे यांचा बनलेला आहे. परांजपे हे घराणे संख्येने बहुसंख्यि आणि कर्तबगारीने इतरांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करणारे आहे. शिवकाल आणि पेशवाईत सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी उपनाव, आडनावे लावण्याची प्रथा नव्हती. पूर्वजांविषयी जिज्ञासा हा एक स्थायी भाव माणसात आढळतो. आपले पूर्वज कसे होते, कसे राहत असत, त्यांनी आपला जीवनक्रम कसा व्यतीत केला, याविषयी आपल्याला उत्सुकता असते व आपल्याला असणे स्वाभाविकच आहे. परांजपे आडनाव आणि त्याची व्युत्पत्ती अनेकांनी दिली आहे.. त्या सगळ्याचा साकल्याने विचार करू. परांजपे घराणे हे ऋग्वेदी, शकलाशाखा, आश्वलायन सूत्र, ट्रीपवर असून पूर्वी शैवपंथी परंतु आता विष्णुपंथी आहेत. त्यांचे तीन प्रवर असून विष्णुवृद्ध (विष्णूवर्धन) गोत्र आहे. संकल्प करताना व्यक्ती असे म्हणते. "त्रिप्रवरान्वित विष्णुद्ध गोत्रोत्पन्न आडिरसपौरुकुत्स्यत्रासद्स्यवेति" अनेक लेखकांनी परांजपे शब्दाची व्युत्पत्ती निरनिराळ्या प्रकारे दिली आहे. परांजपे घराण्याच्या इतिहासाची पहिली आवृत्ती यामध्ये शास्त्रीबुवा विष्णू विनायक परांजपे यांनी परांजपे आडनावाविषयी उहापोह केला आहे. त्याचप्रमाणे परांजपे कुळाविषयी ऐतिहासिक उल्लेख अशी पुस्तिका कै. दि. धों. परांजपे यांनी मुर्डी, ता. दापोली येथे सन १९३५ मध्ये प्रकाशित केली त्यामध्ये खालीलप्रमाणे परांजपे नाव लिहिता येते, असे दाखविण्यात आले आहे. पारायणजपे - पराजपे - परांजपे (प्राणजपे, पराजप्ये, प्राजप्ये, परांजपे)

१९३४ सालच्या परांजपे कुलवृत्तांतामध्ये काही ऐतिहासिक कागदपत्रांचा उल्लेख आहे. इ. स. १६०० मध्ये विठ्ठल 'पारायणजप्या' असे नाव आहे. शके १६२७ मध्ये विठ्ठलभत 'पारायणजपें', शके १६५४ मध्ये रामकृष्णभट विश्वनाथभट पारायणजपें असा उल्लेख आहे. पुढे १६५७ मध्ये पराजप्ये शके १६६३ मध्ये पराजपे आणि १६७९ मध्ये 'प्राजप्ये' शके १६८४ मध्ये दोन वेळा 'परांजपे' शके १८८५ मध्ये परांजपे तर पुढे पराजप्ये असे उल्लेख आहेत. यावरून सध्याचे परांजपे हे नाव पारायणजपें - पराजपे पराजप्ये) - परांजपे (परांजप्ये) असे आले असावे असे वाटते. परांजपे या नावाच्या व्युत्पत्तीबरोबरच आणखी एक व्युत्पत्ती देता येते. जप चार वाणी मध्ये करता येतो, परा, पश्यंती, माध्यम आणि वैखरी. जपाची सुलभता मात्र उलट्या क्रमाने म्हणजे वैखरी, माध्यम, पश्यंती आणि परा अशी आहे. 'परा' वाणी म्हणजेच अतिशय कठीण अशा रीतीने परा-जप करणारा तो पराजप होय. 'पराजप' एवढी दीर्घ शब्द उच्चारणे कठीण म्हणून पराजप एक शब्द केला. म्हणूनच 'पराजप - परांजपे' असे झाले. आणि कोकणी बोलीतील अनुनासिकतेमुळे पराजपे वर परांजपे असा अनुस्वार आला, आणि नाव सिद्ध जाहले परांजपे! यज्ञविशेष, यज्ञसाहित्य, यज्ञातल्या सहाय्यक व्यवस्था यांवर आधारलेली ही उपनाव आहेत. उदाहरण म्हणून पुढील नवे सांगता येतात. आपटे (आप्तोर्याम यज्ञ). पेठे (स्थपति बृहस्पतिसवाच्या यजमानांची पदवी), छत्रे (वाजपेयाच्या यजमानाला शुभ्र छात्रांचा मान असे), परांजपे (सोमयज्ञांना प्राजापत्य म्हणत त्यावरून प्राजापत्ये आणि त्यावरून परांजपे)

'ऐतिहासिक उल्लेख' या पुस्तिकेत आणखी एक व्यत्पत्ती देण्यात आली आहे ती म्हणजे, 'परं' म्हणजे ब्रम्ह, 'जपे' म्हणजे त्याचा ध्यास आगर चिंतन करणारे ते 'परंजपे' अर्थात अपभ्रंश 'परांजपे' वरील विवेचनात १) परावाणीत जप करणारे ते परांजपे होत. २) पूर्वी सम्राट, चक्रवर्ती राजे सोमयज्ञ करत असत, या सोमयज्ञाना प्राजापत्य म्हणत, त्यावरून प्राजापत्ये अपभ्रंशाने परांजपे नाव सिद्ध झाले. ३) ब्रह्माचा ध्यास, चिंतन करणारे ते पराजपे अर्थात अपभ्रंशाने परांजपे अधिक तर्कसिद्द वाटतात. काहीही असले तरी परांजपे हे नाव आता महाराष्ट्रामध्ये, भारतात आणि तसे म्हटले तर जगामध्येदेखील सुप्रतिष्ठित झालेले आहे.