श्री महाकाली पंचायतन

नगरेश्वर
सुमारे आठशे वर्ष प्राचीन असणारी श्री नगरेश्वर ही देवता स्वयंभू असून आडिवरे गांवातील सर्व देवस्थानात आद्य दर्शनीय म्हणून सर्व प्रसंगी मनाली जाते. श्री नगरेश्वराचे हे लिंग सुमारे चार अंगुळ उंचीचे व काळ्या डोंगरी शिळेचे आहे. देवालय पूर्वाभिमुख असून याचे आवार स्वतंत्र आहे. श्रींचे देवालयात वायव्य कोपऱ्यात एक मोठे वारूळ छताला लागेल इतके उंच आहे. हे वारूळ केव्हापासून आहे हे माहिती नाही, परंतु त्यात मोठा सर्प असून तो केव्हातरी आढळतो असे सांगतात. हा नागराज साक्षात्कारी आहे. या नागराजाची प्रतिवर्षी नागपंचमीला वारुळावरच पूजा करतात.
श्री महालक्ष्मी
श्री महालक्ष्मीचे देवालय पश्चिमाभिमुख असून ही देवताही पश्चिमाभिमुख आहे. ही देवता श्री महाकालीचे पंचायतनांतीलक्रमाने दुसरी मनाली जाते. हिची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली. ही मूर्ती उभी, चतुर्भुज, साध्या काळ्या डोंगरी शिळेची कोरलेली आहे. कोणताही अवयव सुटा नाही. हिची उंची सुमारे ३८ अंगुळे आहे. हिचे मागचे डावे हातांत शंख व मागचे उजवे हातांत गदा आहे. पुढचे उजवे हातांत मोदक व पुढचे डावे हातांत कमलपुष्प आहे. हिचे शेजारी जैनांचा देव 'जैनब्राह्मण' म्हणून तांब्याचा टोप आहे. त्याची पूजा नैवेद्य वगैरे श्रीमहालक्ष्मीबरोबरच होते.
श्रीदेव रवळनाथ
श्रीदेव रवळनाथ हा भैरवाचा अवतार आहे. ही पंचायतनांतील तिसरी देवता असून, श्री महाकालीचे उजवे बाजूस, दक्षिणाभिमुख उभी चतुर्भुज, साध्या काळ्या शिळेची, दृष्टी सरळ स्मोक असलेली अशी आहे. हिची उंची सुमारे ३४ अंगुळे आहे. मागचे उजवे हातांत डमरू व डावे हातांत त्रिशूल आहे. पुढचे उजवे हातांत खड्ग व डावे हातांत 'पानपात्र' आहे.
श्रीदेवी महाकाली
हिला पंचायतनांतील चवथी देवता मनाली जाते. ही दक्षिणाभिमुखी साध्या काळ्या शिळेची, सुमारे ३४ अंगुळे उंच, ऊर्ध्वदृष्टी शवावर पद्मासनस्थ, चतुर्भुज, गळ्यात रुंडमाळा, मस्तकावर पंचमुखी शेष धारण केलेला अशी आहे. हिचे मागचे उजवे हातांत डमरू व डावे हातांत त्रिशूल, पुढचे उजवे हातांत खड्ग व डावे हातांत 'पानपात्र' धारण केलेले आहे.
श्री महासरस्वती
ही पंचायतनांतील पाचवी देवता होय. ही साधी काळ्या शिळेची, उभी, उंची सुमारे २४ अंगुळे, सूकरावर बसून पाय खाली सोडलेली, चतुर्भुज, मागचे डावे हातांत पुस्तक, उजवे हातांत 'तरवार', पुढचे उजवे हातांत 'पंचपात्री' व डावे हातांत हिने नाग धारण केला आहे.