श्री महाकाली मंदिर
मंदिराची रचना
हे मंदिर पुरातन असून, श्री महाकाली मूर्ती दक्षिणमुखी आहे. या मूर्तीच्या शेजारी श्री योगेश्वरीची देखील मूर्ती आहे. महाकाली देवीच्या समोर श्री महालक्ष्मीचे मंदिर असून, डाव्या बाजूला श्री महासरस्वतीचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाला आले असता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेल्याचे जाणवते. या मंदिराची रचनादेखील अशा प्रकारची आहे. श्री योगेश्वरी, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री रवळनाथ हे पंचायतन येथे पाहावयास मिळते. श्री महाकाली मंदिरामध्ये सभामंडपातील लाकडी खांबावर आठ, शिवाय तेथेच गणपती, मृदंगी, द्वारात चतुर्भुज द्वारपाल जय-विजय अशा मूर्ती प्राचीन कारागिरांनी कोरलेल्या आहेत. श्रींपुढे सभामंडपात छताला अनेक चित्रे लाकडाच्या पाटावर कोरलेली आहेत.

मंदिरातील नित्यक्रम
सकाळी ७ वाजता मंदिराचे दार उघडतात. धुपारती होऊन नैवेद्य दाखविला जातो. नंतर १० वाजता आरती होते. स्नानाचे वेळी व नैवेद्य दाखविताना देवालयाचे दरवाजे बंद करून घेतली जातात. पौर्णिमा व अमावस्येला सर्व मूर्तीना अभ्यंग करून उष्णोदकाने स्नान घालतात. स्नानानंतर वस्त्राने अंग कोरडे करून वस्त्रे नेसवली जातात. श्री महाकालीला सुवर्णाचा मुकुट, सुवर्णाची चिरी, दृष्टी, नाकात मोती, मंगळसूत्र, सुवर्णाचा कमरपट्टा, चुडे असा नित्य अलंकार घातले जातात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी
सुमारे ३०० वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज अनेक किल्ले, गड सर करत-करत शेवटी खाडी किनारी पूर्णगड हा किल्ला सर करण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा प्रथम श्री महाकाली मंदिरात येऊन गेल्याची खूण म्हणून त्यांचा चित्रित केलेला फोटो मंदिरात उपलब्ध आहे. त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामींचाही चित्रित फोटो आहे. ते आडिवरे, कशेळी, आंबेरूखवाडी या मार्गाने गेले व त्यांनी पूर्णगड हा शेवटचा किल्ला सर केला. विजयदुर्गाचे प्रातांचे आंग्रे सरकारने या मंदिराला भेट व देणगी दिल्याचाही उल्लेख आहे. त्याचप्रमाणे श्रीमती गोखले यांनी या मंदिराला भेट देऊन चांदीची पालखी भेट दिल्याचीही नोंद आहे.