देवीची आख्यायिका
एका पहाटे याच गावापासून ५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वेत्ये येथील भंडारी समाजातील एकाला
मासे पागताना जाळय़ात ५-६ फूट उंच उध्र्व दृष्टी असलेली, शवावर पद्मासनस्थ असलेली, चतुर्भुज,
गळय़ात संड माळा व मस्तकावर पंचमुखी शेष धारण केलेली मूर्ती सापडली. ती घेऊन आडिवऱ्यातील
मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे वाडापेठ येथे आणत असताना त्यावेळी रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या
चर्मकार समाजातील माणसाला दिवा दाखविण्यास सांगितला. त्याने तो दाखविला आणि मूर्ती
वाडापेठ येथे आणण्यात आली. त्यानंतर या मूर्तीची आडिवरे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच
वाडापेठ येथे स्थापना करण्यात आली. हीच मूर्ती म्हणजे ‘आडिवऱ्याची श्री महाकाली’.?वेत्ये
या गावी ही मूर्ती सापडल्याने या गावाला देवीचे ‘माहेर घर’ म्हणतात.
श्री महाकालीचा नवरात्रोत्सव
या मंदिरात शिमगोत्सव आणि नवरात्रोत्सव हे सण मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. मिती
आश्विन शु. प्रतिपदेपासून या देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. मंदिरात घटस्थापना
श्री महाकालीचे उपाध्ये श्री. हर्डिकर हे करतात. यावेळी श्री नगरेश्वर, श्री महाकाली
मंदिर व इतर सर्वत्र पंचगव्य प्रोक्षण करून स्थलशुद्धी केली जाते. श्री महाकालीचे शेजारीच
घटाची स्थापना केली जाते. या घटावर नेहमी माळ बांधली जाते व नंदादीप ठेवला जातो. घटपूजा
झाल्यावर घटाला व श्री महाकालीला नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर नित्याप्रमाणे धुपारती
व महानैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर श्रींचे सुवर्णाचे मुखवटे, श्री महाकालीचे पुढे
स्थापन करण्यात येतात. ते श्री महाकाली व श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री रवळनाथ
याप्रमाणे मांडून मखर घालून, अलंकार, वस्त्रे वगैरेंनी सुशोभित केले जातात. श्री नगरेश्वर
यांचा चांदीचा मुखवटा, छत्री वगैरे अलंकार व महावस्त्रे नेऊन देव सुशोभित केले जातात.
सर्व देवतांना अलंकार, मुखवटे व वस्त्रे नेसविल्यानंतर गंध, पुष्पाने पूजा केली जाते.
नंतर पंचारती होऊन चतु:सीमेच्या ब-यांचे गा-हाणे करण्यात येते. त्यानंतर देवीच्या पालखीची
मिरवणूक काढली जाते. यावेळी प्रथम देवीसमोर आरती करून विविध ठिकाणी थांबून आरती केली
जाते. हा दिनक्रम नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज होत असतो. शेवटच्या दिवशी उपाध्ये
यांच्याकडून घट उद्यापन केले जाते.?त्यानंतर घटाजवळ बळी दिला जातो. (हा बळी कोहळय़ाचा
असतो) अशा प्रकारे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. श्यामल सागराच्या, श्यामल वनश्रीच्या
व श्यामल पर्वतराजाच्या निसर्गसुंदर रमणीय स्थानी असलेल्या महिषासुराचा वध करणाऱ्या,
जगाची उत्पत्ती, स्थिती, लय सांभाळणाऱ्या श्री महाकालीच्या या स्थानाचे महात्म्य कोकणवासीयांना
भक्ती प्रेमसुधेने पुलकीत करते. तिची ख्याती आज दूरवर पसरली असून, नवसाला पावणारी,
भक्तांच्या हाकेला धावणारी, त्यांची मनोकामना पूर्ण करणारी ‘श्री महाकाली’ अशी तिची
ख्याती आहे. भिन्न-भिन्न पापांनी मलीन झालेले अंत:करण या महामंगलेच्या चरणी आश्रयाला
येताच निर्मल होते, यात शंका नाही.
दर्शन असे घ्यावे?
देवीचे दर्शन घेताना सुरुवातीला परिसरातील नगरेश्वराचे दर्शन घ्यावे. त्यानंतर श्रीदेवी
महालक्ष्मी, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी महाकाली व त्यानंतर श्रीदेवी महासरस्वतीचे दर्शन
घेण्याची प्रथा आहे.
मुखवटे लावण्याची प्रथा
श्रीदेवी महाकालीला मुखवटे (रुपे) लावण्याची प्रथा आहे. हे मुखवटे ठरावीक सणांपुरताच
लावले जातात. त्यामध्ये चैत्र शु. प्रतिपदा-पाडवा, अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु.
दशमी-नवरात्रोत्सव, मार्गशीर्ष शु. प्रतिपदा-देवदिवाळी आणि पौष पौर्णिमेला हे मुखवटे
लावले जातात