मंडळाचे कार्य

१९५८ नंतर २००१ साली कुलवृत्तांताचे प्रकाशन श्रीदेव लक्ष्मीनारायण, भराडे येथे करण्यात आले. त्याचवेळी सर्व परांजपे, मंडलिक व देव कुटुंबीय किमान वर्षातून एकदा तरी येथे जमले पाहिजेत असे ठरविण्यात आले. सांगताना अतिशय आनंद होतो की आजतागायत ही पद्धत सुरु असून यापुढेही चालू राहील.

२००१ पर्यंत फक्त मुंबई शाखाच कार्यरत होती आणि २००१ मधे पुणे शाखेचे कार्य पुन्हा सुरु करण्यात आले. पुण्यामध्ये झालेल्या मीटिंग मध्ये असा मुद्दा उपस्थित केला गेला कि श्री देव लक्ष्मीनारायण, भराडे येथे निवासाची तसेच भोजनाची कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे इच्छा असूनही देवाच्या चरणी थांबता येत नसे. सबब किमान ५ ते ६ खोल्यांचा भक्तनिवास तेथे २००३ पूर्वी बांधायचा असे ठरले आणि त्याप्रमाणे तो बांधण्यात आला, त्यासाठी सर्व परांजपे मंडळींनी ७ लाख रुपये उभे केले. अतिशय थाटामाटाने आणि धार्मिक कार्याने त्याचे उदघाटन झाले.

२००३ पर्यंत मंडळाच्या मुंबई व पुणे शाखाच कार्यराय होत्या, असे ठरले की इतर शहरामध्ये सुध्दा शाखा सुरु करणे गरजेचे आहे, जेणेकरून मंडळाच्या कामाची व्याप्ती वाढविता येईल त्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, सातारा, नागपूर, दापोली, चिपळूण, गुजरात तसेच इंदोर या शाखा सुरु करण्यात आल्या. असाही एक विचार पुढे आला कि जर मंडळाचे कार्य वाढवायचे असेल आणि भविष्यकाळात अजून काही योजना अमलात आणावयाच्या असतील तर एक विश्वस्त मंडळ निर्माण करणे गरजेचे आहे त्यानुसार २००३ साली परांजपे विश्वस्त मंडळ - मध्यवर्ती न्यासाची स्थापना करण्यात आली.

२००४ साली भराडे येथे एक सभा घेण्यात आली. श्री देव लक्षमीनारायण न्यास आधीपासून अस्तित्वात होताच. त्या सभेमध्ये असा विचार मांडल्यात आला की दोन्ही न्यास मिळून मंदिराचा संपूर्ण जिर्णोध्दार करू शकतात परंतु श्री लक्षमीनारायण न्यासाने असमर्थता व्यक्त केली, परंतु त्यांनी असे सुचविले की जर तुम्ही खर्च करणार असाल तर या न्यासामध्ये किमान सहा परांजपे विश्वस्त आपण ठेऊ म्हणजे निर्णय प्रक्रियेला विलंब होणार नाही. त्याप्रमाणे न्यासात सहा परांजपे विश्वस्त दाखल करून घेण्यात आले.

त्यानंतर २००७ सालच्या गोकुळाष्टमी उत्सवात असे ठरविण्यात आले कि, २०११ साली आपल्या मंदिराला ४०० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने संपूर्ण मंदिराचा जिर्णीध्दार करावयाचा संकल्प करण्यात आला. सदरचे काम दोन टप्प्यामध्ये करावयाचे असे ठरले. त्यानुसार २०१४ साली गाभाऱ्याचे संपूर्ण नूतनीकरण केले व २०१६ साली सभामंडपाचे नूतनीकरण करण्यात आले, हे सर्व करण्यासाठी वर्गणी द्वारे आपण ७० लाख रुपये उभे केले.

२००३ पासून भराडे येथे शाळेच्या विद्यार्थाना मदत, शाळेला देणगी, पंचक्रोशीतील हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार असे सामाजिक उपक्रम राबविले जातात.