मंदिराची रचना
श्रींचे मंदिर पूर्वाभिमुख असून आवारातून बाहेर पडण्याच्या पूर्वद्वारावर बंगला आहे.
येथेच शेजारी शके १८२० (सन १८९८) चे सुमारास वेदशाळा होती. महाद्वाराचे बाहेर विहीर
फार जुनी व मोठी बांधीव आहे. मंदिराचे तीन विभाग आहेत. श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती
असलेला मूळ गाभारा, त्याला लागून असलेला छोटासा विभाग ज्यामध्ये डावीकडे श्री गणपती
व उजवीकडे श्री दत्ताच्या सुंदर मूर्ती आहेत आणि पुढील प्रशस्त दुमजली सभामंडप. या
सभामंडपामध्ये उत्सवप्रसंगी कीर्तने होतात.
देवालयात होणारी धर्मकृत्ये
अश्विन शु. १५ पासून कार्तिक शु. १५ पर्यंत रोज दीपोत्साह, हरिजागर होतो. कार्तिक शु.
११ रोजी रात्रौ १० वाजता रुंदे येथील वांकडें खोत हे त्रिपुराची पूजा करून त्रिपुर
प्रज्वलित करतात. या त्रिपुराची दुरुस्ती शके १८५६ साली रुंदेकर - खोत यांनी केली.
शुद्धपक्षात व कृष्णपक्षात एकादशीपासून पाच दिवस उत्सव होतो. हा उत्सव मोगरे, भराडे,
राजवाडी येथील लोक पट्टी करून करतात. पट्टीची यादी पुरातन केलेली आहे. त्याप्रमाणे
वसूल करावयाचा.
कार्तिक शु. १० रात्रौ दहा वाजता श्रींची पालखी सजवून मिरवणूक निघत असते. प्रथम देवालयासभोवार
दोन प्रदक्षिणा करून, मंदिरासमोरील अश्वत्थाचे पारावर जाते. तेथे महानैवेद्य समर्पण
केला जातो. येथून रात्रौ सुमारे एक वाजता श्रींची स्वारी मंदिरात दाखल होते.
श्रवणमासात जन्माष्टमीला दोन दिवस उत्सव होतो व दहीकाला होतो.