आडिवरे गाव

आडिवरे गाव हे प्राचीन गाव असून पहिल्या व दुसऱ्या शतकातील शिलाहार वंशातील भोजराजाचे एक ताम्रपात्र येथे मिळाले आहे. भोजराजाने या ताम्रपत्रांत कशेळी गावाच्या बारा ब्राह्मणांना प्रतिदिनी भोजनार्थ त्याच गावाचे उत्पन्न दान दिले आहे. त्यामध्ये 'अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कासेलिग्रामे' असा कशेळी गावाचा उल्लेख केला आहे. कंपण या कानडी शब्दाचा अर्थ देशविभाग असा आहे. अट्टाविरे भागातील कशेळी गाव असा याचा अर्थ. अट्टाविरे म्हणजे बाजाराचे गांव. पूर्वी येथे बाजारपेठ असावी. अट्टाविरे, अठ्ठाविरे याचाच अपभ्रंश होऊन आडिवरे झाले असावे. चौदा लहान लहान वस्त्या म्हणजेच वाडे मिळून आडिवरे गांव वसले आहे. त्यापैकी वाडा मोगरे व वाडा भराडे यांच्या सीमारेषेवर, परांजपे घराण्याचा कुलदेव लक्ष्मीनारायण यांचे मंदिर आहे. तर कुलदेवता श्री महाकाली हिचे देवालय प्राचीन असून ते वाडापेठ येथे वसलेले आहे. या दोन देवतांशिवाय इतरही अनेक देवता आडिवरे ग्रामी आहेत. त्यातील प्रमुख देवता म्हणजे श्री नगरेश्वर, श्री महाकाली, श्री योगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ, श्री महालक्ष्मी, श्री सत्येश्वर, श्री गणपती या होत. त्यांचे कलमं सर्वसाधारणपणे आठव्या ते तेराव्या शतकापर्यंतचे आहे. चित्तपावन समाजातील परांजपे घराणे आडिवरे येथे प्राचीन काळापासून नांदत आहे. या परांजपे घराण्याच्या दृष्टीने महत्वाच्या देवता म्हणजे श्रीदेव लक्ष्मीनारायण श्री महाकाली, श्री योगेश्वरी, श्री सत्येश्वर व श्री महालक्ष्मी या होत. त्यापैकी काहींचा परिचय करून घेणे अत्यंत आवश्यक ठरेल.